दत्तराज मित्रमंडळाचा पुढाकार; १९ एप्रिलला सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
विविध कार्यक्रमांचे आकर्षण; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे दत्तराज मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या उत्सवासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.०० वाजता पाककला स्पर्धा (खाद्यपदार्थ मूग) होणार असून, महिलांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा (वयोगट १४ वर्षापर्यंत) रंगणार आहे. रात्री ८.०० वाजता प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि गणेश ठाकूर दिग्दर्शित ‘अजरामर’ नाट्यकृती इथे ओशाळला मृत्यू सादर केली जाणार असून, या नाटकाद्वारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे दर्शन घडणार आहे. दत्तराज महिला मंडळाच्या वतीने चित्रकला, पाककला व फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहीती व नावनोंदणीसाठी उदय बल्लाळ, उन्नती राणे, ममता धुरी व गजानन कुडाळकर यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









