ठळक घडामोडी

सिंधुदुर्गात दाट धुक्याचे सावट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन!

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे

शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्याचे पालन करून पिकांची योग्य काळजी घ्यावी

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून खबरदारीच्या सूचना जारी

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
       सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार २३ फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळपासून जिल्ह्यात अनेक भागांत दाट धुके पसरल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत खबरदारीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
      धुके म्हणजे हवेत तरंगणाऱ्या पाणी व बर्फाच्या सूक्ष्म कणांमुळे निर्माण होणारी स्थिती असून त्यामुळे दृश्यमानता कमी होते. किमान १ किलोमीटरपर्यंतचा रस्ता स्पष्ट न दिसल्यास ती धुक्याची स्थिती मानली जाते. साधारणतः २०० ते ४०० मीटरपर्यंतचे अंतर न दिसल्यास मध्यम धुके, ५० ते २०० मीटरपर्यंत दृश्यमानता कमी झाल्यास दाट धुके तर ५० मीटरपेक्षा कमी अंतर दिसल्यास अतिदाट धुके मानले जाते.
धुक्याच्या परिस्थितीत सार्वजनिक सुरक्षेसाठी व रस्ते अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
      प्रवासादरम्यान मुख्य रस्त्यावर वाहने उभी करू नयेत. वाहन थांबविल्यास फॉग लाईट किंवा पार्किंग लाईट सुरू ठेवावेत. वाहन चालविताना इंडिकेटरचा वापर करावा तसेच डिफॉगर व विंडस्क्रीन वायपरचा वापर करणे आवश्यक आहे. याशिवाय फॉग लाईट किंवा लो-बीम हेडलाईटचा वापर करणे, पुढील वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, नियंत्रित वेगात वाहन चालविणे तसेच अचानक ब्रेक लावण्याच्या परिस्थितीसाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. अनावश्यक ओव्हरटेकिंग टाळावे व लेन शिस्त काटेकोरपणे पाळावी. वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी चालकांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे. रस्त्यावरील चिन्हे व सूचना फलकांचे पालन करून सावधगिरीने वाहन चालवावे. विशेषतः पहाटे व उशिरा रात्री प्रवास करताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
      अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या!
      सार्वजनिक वाहतूक वाहने, ट्रॅक्टर-ट्रॉली, शाळा वाहने तसेच अवजड वाहनांवर रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे सुनिश्चित करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहन चालविताना डावीकडे किंवा उजवीकडे वळताना इंडिकेटरचा वापर करणे आवश्यक असून अवजड वाहन चालकांनी वाहनाच्या बाहेर माल लोंबकळेल अशा पद्धतीने वाहतूक करू नये. तसेच ओल्या रस्त्यावर वाहन चालविताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या कृषी सल्ल्याचे पालन करून पिकांची योग्य काळजी घ्यावी. हवामानाची अद्ययावत माहिती भारतीय हवामान विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२-२२८८४७), टोल फ्री क्रमांक १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!