ठळक घडामोडी

पावशीत सखी, पिंगुळीत आदर्श तर माणगाव मध्ये सेल्फी मतदान केंद्र!

कुडाळ तालुक्यात ६७ उमेदवार रिंगणात, १.१६ लाख मतदार करणार मतदान

निवडणूक यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिका-यांची माहीती

कुडाळ : प्रतिनिधी
      जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कुडाळ तालुक्यात शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी कुडाळ तालुक्यातील संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती कुडाळच्या निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली.
       मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तालुक्यात २४ क्षेत्रीय अधिकारी, १५३ केंद्राध्यक्ष, ४६० मतदान अधिकारी व प्रत्येक मतदान केंद्रावर शिपाई व व्यवस्थापक नेमण्यात आले आहेत. राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण ८५० निवडणूक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, सर्वांना दोन वेळा निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी ३५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कार्यवाहीसाठी तालुक्यात दोन जलद कृती पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ९ जागा व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी एकूण ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कुडाळ तालुक्यातील १५३ मतदान केंद्रांवर एकूण १,१६,६३० मतदार मतदान करणार असून, त्यामध्ये ५८,०९९ महिला व ५८,५३१ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदारांना विशेष सुविधा देण्यासाठी पावशी–ढवणवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक २८/१५ येथे ‘सखी मतदान केंद्र’, पिंगुळी येथील मतदान केंद्र क्रमांक ३१/०७ येथे ‘आदर्श मतदान केंद्र’, तर माणगाव येथील मतदान केंद्र क्रमांक ३३/०५ येथे ‘सेल्फी मतदान केंद्र’ स्थापन करण्यात आले आहे. निवडणूक पथकांच्या दळण-वळणासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या २३ बसेस, २८ जीप तसेच इतर आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले.

error: Content is protected !!