
नरडवे रोडवर उभी कार पेटली; नागरिकांची घटनास्थळी धाव

कणकवली : प्रतिनिधी
कणकवली नरडवे रोडवरील रेल्वे स्टेशनसमोर उभी असलेली एक कार अचानक पेट घेऊन जळाल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार ही सीएनजीवर चालणारी कार असून आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. काही वेळातच कारच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आणि स्थानिकांनी सुरक्षित अंतर राखत परिस्थिती पाहण्यासाठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांना कळविण्यात आले असून या नेमकी कोणत्या कारणामुळे लागले हे अजून स्पष्ट झाले नाही आहे. उपस्थित नागरिकांनी याचा फोटो व व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये देखील कैद केला आहे.









