

जि.प.–पं.स. निवडणुकीत यश निश्चित; हरी खोबरेकर यांचा विश्वास
मालवण : प्रतिनिधी
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘लढणाऱ्यांना यश येते’ ही शिवसैनिकांना शिकवण दिली आहे आणि या शिकवणी नुसारच आम्ही मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. आमची ही लढाई या भागाच्या विकासासाठी असल्याने जिल्हा परिषद – पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेला यश मिळेल असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या आजच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण तहसील कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, नंदू गवंडी, भगवान लुडबे, मनोज मोंडकर आदी व इतर उपस्थित होते. या दरम्यान माजी आमदार वैभव नाईक यांनीही उपस्थिती दर्शवीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पत्रकारांशी बोलताना श्री हरी खोबरेकर म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार हे जनशक्तीच्या जोरावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवीत आहेत. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेना निवडणूक रिंगणात उतरली आहे. आज ठाकरे शिवसेनेने जे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत ते सर्वसामान्य जनतेतील उमेदवार आहेत. सर्वसामान्य घटकातील उमेदवार आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ते निश्चितपणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये निवडून जातील असा विश्वास व्यक्त करताना श्री.खोबरेकर म्हणाले गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद बळकट करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जे प्रयत्न केले, ते प्रयत्न जनतेसमोर या निवडणुकीच्या निमित्ताने मांडले जाणार आहेत. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









