‘साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग’चा अनोखा उपक्रम
कुडाळ : प्रतिनिधी
‘एल. एम. नाईक स्मृती प्रित्यर्थ’ साद फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. गेल्यावर्षी हि स्पर्धा सातासमुद्रापार पोचलेली आहे. गुरु-शिष्य प्रेमपत्र असा स्पर्धेचा विषय असून गुरु–शिष्य प्रेमपत्र म्हणजे शिष्याने आपल्या गुरुंबद्दल मनात असलेला आदर, श्रद्धा, कृतज्ञता आणि समर्पण व्यक्त करण्यासाठी लिहिलेले पत्र होय. येथे “प्रेम” या शब्दाचा अर्थ रोमँटिक प्रेम नसून गुरुंच्या ज्ञानावर, मार्गदर्शनावर आणि व्यक्तिमत्त्वावर असलेली निष्ठा व आपुलकी असा आहे. या पत्राचा मुख्य उद्देश म्हणजे गुरुंनी दिलेल्या शिक्षणामुळे शिष्याच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल सांगणे, त्यांच्या शिकवणीचे महत्त्व स्पष्ट करणे आणि गुरु–शिष्य नात्याची पवित्रता अधोरेखित करणे. तसेच शिष्याने आपले विचार, भावना आणि कृतज्ञता नम्रपणे व्यक्त करणे हाही यामागचा हेतू आहे. थोडक्यात, गुरु–शिष्य प्रेमपत्र हे ज्ञान, संस्कार आणि आदर यांचे भावनिक प्रतिबिंब आहे.
गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वा. पर्यंत स्पर्धकांनी १ हजार ते २ हजार शब्दात पत्रलेखन करून साद फाऊंडेशनच्या व्हॉट्सअप नंबरवर ९४०४३९५४३९ वर पाठवावी, असे आवाहन साद फाऊंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक सावंत यांनी केले आहे.
सर्व वयोगटासाठी ही स्पर्धा खुली असून १४ फेब्रुवारी रोजी सायं. ४ वा. बाबा भालचंद्र अपार्टमेंट बी विंग तळमजला नागवेकर हॉस्पिटलजवळ कणकवली येथे या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे यावर्षी बक्षिसाची रक्कम वाढविण्यात आलेली आहे. नारायण सखाराम मडव यांचे स्मरणार्थ मनोहर नारायण मडव यांजकडून विजेता यास प्रथम क्र. २२२२ रू. व सन्मानचिन्ह, कृष्णा गंगाराम कोर्लेकर यांच्या स्मरणार्थ शालिनी कृष्णा कोर्लेकर यांजकडून द्वितीय ११११ रू., व सन्मानचिन्ह आणि सुनंदा आणि शिवाजी तांबे यांच्या स्मरणार्थ संजय तांबे यांजकडून तृतीय ७७७ रू. व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र व भेटवस्तू असे बक्षिसाचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला अजय कांडर ज्येष्ठ साहित्यिक व स्तंभलेखक, संध्या तांबे, सुप्रसिद्ध कवयित्री, आर्किटेक्ट शंकर सावंत, दिपाली गौरेश नाईक,प्रशासकीय अधिकारी, दोडामार्ग नगरपंचायत. साद फाऊंडेशनच्या संस्थापिका लतिका नाईक, अध्यक्षा गितांजली नाईक, प्रशासकीय अधिकारी,लांजा नगरपंचायत.तसेच सचिव तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सचिन कोर्लेकर, खजिनदार गौरेश नाईक, लेखक संजय तांबे, प्रा. अपूर्वा गोलतकर, वर्षा तळेकर आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील सहभागी लेखकांना स्वतःच्या आवाजात सादरीकरण करण्याची संधी बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी दिली जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी पत्रलेखन स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन गितांजली नाईक यांनी केले आहे.









