जय जय भराडी देवीचा नामघोष; दोन दिवसांचा उत्सव भक्तिभावात साजरा
मालवण : महेश कदम
आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या यात्रोत्सवाला सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून भक्तिभावात सुरुवात झाली. मंगळवार, दि. १० फेब्रुवारीपर्यंत दोन दिवस चाललेल्या या यात्रोत्सवात पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी श्रद्धेने हजेरी लावली. नवस फेडत ‘माय माऊली, आम्हा लेकरांवर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे’ असे साकडे भाविकांनी घातले.
सोमवारच्या पूर्वसंध्येपासून यात्रोत्सवात गर्दीचा उच्चांक वाढू लागला. भाविकांना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी दहा रांगांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे काही मिनिटांतच देवीचे दर्शन होत होते. आंगणे कुटुंबीय, ग्रामस्थ मंडळ व प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे यावर्षीचा यात्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पडला.
प्रसाद ताट्यांचा विधी; मंत्रघोषात भक्त तल्लीन
“जय जय भराडी देवी”, “श्री देवी भराडी माते नमो नमः” या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रात्री सुमारे ९ वाजता देवीला प्रसाद (ताटे) अर्पण करण्याच्या धार्मिक विधीस प्रारंभ झाला. प्रथम देवीच्या मानकऱ्यांची ताटे सुहासिनी महिलांनी पारंपरिक पद्धतीने डोक्यावर घेऊन मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर ग्रामस्थांनी स्वयंपाकगृहात शिजवलेल्या महाप्रसादाची ताटे देवालयात आणली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध, मात्र प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.महाप्रसादानंतर दरवर्षीप्रमाणे अनेक भाविकांनी आंगणे कुटुंबीयांच्या घरी जाऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन रांगा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी रांगा सुरू करण्यात आल्या.
मान्यवरांची उपस्थिती
पहिल्या दिवशी पालकमंत्री नितेश राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, बृहन्मुंबई माजी सुधार समिती अध्यक्ष सदा परब, मुंबई नगर सेविका श्रवरी सदा परब, माजी प. स. सदस्य महेश बागवे, समर्थ पतपेढी अध्यक्ष प्रकाश परब, जेट एअरवेजचे अनिल बागवे, हिमराज सावंत, मंगलेश परब, प्रशांत मयेकर, प्रशासक वी के जाधव, सुनील चाव्हान, महसूल अधिकारी डी व्ही शिंगरे, दिपक लिंगायत, आनंद तांबे, सुगंध तांबे, आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, दिनेश आंगणे, अर्जुन आंगणे(काका) जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, जिल्हा पोलिस अधिक्षक मोहन दहिकर, मालवण तहसीलदार आदी तसेच मान्यवर उपस्थित होते.
यात्रोत्सवात राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, औद्योगिक तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले. यामध्ये जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, राजन विचारे, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, हास्यजत्रा फेम अरुण कदम, उद्योजक डॉ. दीपक परब, सौ. राधिका परब, विशेष कार्यकारी अधिकारी वर्षा झाल्टे, माजी नगरसेवक सदा परब, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले.
तसेच आरोग्य सुविधा स्टॉल व वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोग्य यंत्रणाही सतर्क होती. यात्रोत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आंगणेवाडी ग्रामस्थ व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आकर्षक विद्युत रोषणाई; सेल्फीचा मोह
यावर्षी संपूर्ण व्यासपीठ परिसर व स्वागत कक्षात मोठ्या स्क्रीनवर देवीचे दर्शन भाविकांना घडवण्यात आले. मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई व लेझर किरणांच्या प्रकाशझोतांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण आंगणेवाडी रोषणाईने उजळून निघाली होती. तरुणाई मोबाईलवर सेल्फी घेताना दिसून येत होती. भव्य सभामंडप, चलचित्र देखावा, खाजा-मिठाईची दुकाने व विविध स्टॉल्समुळे परिसर गजबजून गेला होता. विविध वस्तूंची खरेदी करताना भाविक दिसत होते. “अतिथींची आधी सेवा” ही आंगणेवाडीवासीयांची परंपरा यावर्षीही जपली गेली.









