ठळक घडामोडी

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील खासगी आस्थापने राहणार बंद!

कुडाळ तालुक्यात मनाई आदेश जारी; उल्लंघन केल्यास कारवाई

कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांचे आदेश

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. उद्या शनिवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेदरम्यान कुडाळ तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. कुडाळचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी शुक्रवारी हा आदेश जारी केल्याची माहीती दिली.
      कुडाळ तालुक्यात ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणांमधील एकूण १५३ मतदान केंद्रांवर शनिवारी ७ फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान कालावधीत मतदान केंद्रांच्या परिसरात २०० मीटरच्या आत आस्थापना सुरू राहील्यास त्या ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते किंवा इतर समाजकंटक एकत्र जमल्यास विविध कारणावरून त्यांच्यात वादविवाद होऊन सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
       कुडाळचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व खाजगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी जमाव करणे, मिरवणूक काढणे, रस्ता रोको करणे, मतदान केंद्रांच्या परिसरात फिरणे, शस्त्र किंवा शस्त्रासारख्या वस्तू बाळगणे, दगड, काठ्या, लाठ्या, तलवारी, भाले आदी वस्तू जवळ बाळगणे तसेच दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे तसेच सोबत घेऊन फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसरात बंदोबस्तासाठी असणा-या पोलिसांनी दिलेल्या सूचनांचा भंग होईल, अशा त-हेचे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

error: Content is protected !!