शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेते, मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश
कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे, सावंतवाडीचे दीपक केसरकर यांच्यावरही मोठी जबाबदारी

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
मुंबईसह राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून, उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेने तब्बल ४० स्टार प्रचारकांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. ही घोषणा बुधवारी शिवसेना कार्यालयातून करण्यात आली.
या स्टार प्रचारकांच्या यादीत शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, मीनाताई कांबळे, नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या यादीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांचाही समावेश करण्यात आला असून, त्यांच्या खांद्यावर प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व नेतेमंडळींनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. जनतेच्या सेवेसाठी, पक्षाच्या विचारांसाठी आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या ध्येयासाठी पूर्ण समर्पणाने कार्य करण्याचा शब्द देतो,” असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या जाहीर झालेल्या स्टार प्रचारकांमध्ये पुढील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, डॉ. श्रीकांत शिंदे (खासदार), प्रतापराव जाधव (केंद्रीय मंत्री), डॉ. नीलम गोऱ्हे, मीनाताई कांबळे, गुलाबराव पाटील (मंत्री), दादाजी भुसे (उपनेते व मंत्री), उदय सामंत (उपनेते व मंत्री), शंभूराज देसाई (उपनेते व मंत्री), संजय राठोड (मंत्री), संजय शिरसाट (प्रवक्ते व मंत्री), भरत गोगावले (उपनेते व मंत्री), प्रकाश आबिटकर (मंत्री), प्रताप सरनाईक (मंत्री), आशिष जयस्वाल (राज्यमंत्री), योगेश कदम (राज्यमंत्री), दीपक केसरकर (प्रवक्ते व आमदार), श्रीरंग बारणे (उपनेते व खासदार), धैर्यशील माने (खासदार), संदीपान भुमरे (खासदार), नरेश म्हस्के (खासदार), रविंद्र वायकर (खासदार), मिलिंद देवरा (खासदार), डॉ. दीपक सावंत (उपनेते व माजी मंत्री), शहाजी बापू पाटील (उपनेते व माजी आमदार), राहुल शेवाळे (उपनेते व माजी खासदार), डॉ. मनीषा कायंदे (सचिव व आमदार), निलेश राणे (आमदार), संजय निरुपम (प्रवक्ते), राजू वाघमारे, ज्योती वाघमारे, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, युवासेना सचिव राहुल लोंढे, शिवसेना प्रवक्ते व धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष समीर काझी, राष्ट्रीय प्रवक्त्या श्रीमती शायना एन.सी., तसेच माजी खासदार गोविंदा अहुजा.
मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना विकास, पायाभूत सुविधा, नागरी प्रश्न आणि लोकाभिमुख योजनांच्या मुद्द्यावर आक्रमक प्रचार करणार असून, या ४० स्टार प्रचारकांच्या जोरावर शिवसेना निवडणूक रणांगणात पूर्ण ताकदीने उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.









