नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघातून रूपेश पावसकर अपक्ष मैदानात
स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवणार; २७ जानेवारीला पाठींब्याचा निर्णय
‘नेरूर गाव विकास आघाडी’ पॅटर्नचे नेरूरमध्ये संकेत; पावसकर यांची पत्रकार परिषद
कुडाळ : प्रतिनिधी
नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघातून रूपेश पावसकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रश्न आणि विकासात्मक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार असून, गावातील स्थानिक ग्रामस्थांनी आपल्याला जाहीर पाठींबा देण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पावसकर म्हणाले की, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण निवडणूक रिंगणात पुढे जाणार आहोत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच २७ जानेवारी रोजी, पाठींब्याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. आपण भाजपचे कार्यकर्ते असलो तरी कोणत्याही पक्षाबाबत नाराज नसल्याचे स्पष्ट करत, ही लढत स्थानिक विकासासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गावाचा आपल्याला पाठींबा असून नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघात नेरूर गावविकास आघाडी असा कणकवली नगरपालिका निवडणुकीतील ‘शहर विकास आघाडी’ पॅटर्न राबवण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले.









