कणकवली : प्रतिनिधी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणीसाठी टेबलची रचना व मतमोजणीची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. १७ प्रभागांची ५ टेबलवर ४ फेºयांमध्ये मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी सकाळी १० वाजता सुरु होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली आहे.
कणकवली तहसीलदार कार्यालयात गुरुवारी मतमोजणीच्या निमित्ताने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक तेजस नलवडे व निवडणूक अधिकारी व कर्मचाºयांची नियोजन बैठक झाली. यामध्ये मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचा-यांचे नियोजन आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासाठी ३० निवडणूक अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच पोलीस अधिकारी , कर्मचारी , होमगार्ड बंदोबस्तासाठी असणार आहेत. शहरविकास आघाडी व भाजपा या दोन्ही पक्षांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी २ जागा निश्चित केल्या जाणार आहे. जेणेकरुन कायदा व सुव्यवस्था होईल. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे त्याचप्रमाणे मतमोजणी देखील शांततेत पार पडली पाहिजे , असे नियोजन करत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले आहे.
स्ट्रॉंग रुम बाहेर कडेकोट बंदोबस्त
कणकवली नगरपंचायत निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष व १७ नगरसेवकपदासाठी मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रुममध्ये सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत. या स्ट्रॉंग रुमबाहेर सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वांना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.








