ठळक घडामोडी

शिकारीदरम्यान गोळीबार; आचिर्णेत युवकाचा मृत्यू!

एक गंभीर जखमी; वैभववाडीत खळबळ

वैभववाडी : प्रतिनिधी
       आचिर्णे गावात मंगळवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण वैभववाडी तालुका हादरून गेला आहे. घाणेगडवाडी परिसरात झालेल्या या प्रकारात एका २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत युवकाचे नाव सागर सुरेश पोटळे (वय २६, रा. घाणेगडवाडी, आचिर्णे) असे असून, कृष्णा सुरेश कातकर (वय २५) हा गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
       मिळालेल्या माहितीनुसार, आचिर्णे गावातील कालव्याजवळ हे तरुण शिकारीसाठी गेले असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. सखल भागात उभे असताना उंच भागावरून कोणीतरी जनावर असल्याच्या संशयावरून गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या गोळीबारात सागर पोटळे याच्या चेहऱ्यावर व हातावर गोळ्या लागून त्याचा मृत्यू झाला, तर कृष्णा कातकर यांच्या अंगावर तब्बल अकरा ठिकाणी गोळ्या लागल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनावळकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा व जबाब घेण्याचे काम सुरू आहे.तर मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून, जखमी कृष्णा कातकर याच्यावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून त्याचा जबाब नोंदवण्याचे  काम सुरु असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान यापूर्वीही कणकवलीत शिकारीदरम्यान झालेल्या अशाच प्रकारात एकाचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे जीव गमावण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बेकायदेशीर शिकारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शिकारीच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांवर आळा बसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!