अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
शिवज्योत रॅलीसह राजमाता जिजाऊ चौकात भव्य सोहळा
कुडाळ : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन गुरूवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक उपक्रम व मान्यवरांचा गौरव सोहळा यावेळी पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मालवण किल्ल्यावर शिवज्योत घेऊन होणार असून ओरोस येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर कुडाळ एमआयआरएम कॉलेज येथून रॅली निघून जिजामाता चौक येथे जाईल व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवज्योत लावण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता शिवजन्मोत्सव सोहळा होणार असून सायंकाळी ६.३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ मधील राजमाता जिजाऊ चौक येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात ग्रुप डान्स, लहान मुलांचे डान्स व पारंपरिक वेशभूषा, मान्यवरांचे स्वागत, ‘गर्जा जयजयकार’ सादरीकरण तसेच पारंपरिक वेशभूषा फॅशन शो आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. यावेळी शिवप्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, तालुकाध्यक्ष संतोष परब, युवा तालुकाध्यक्ष शैलेश घोगळे, शहर अध्यक्ष योगेश काळे तसेच शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.









