

कणकवली : प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता ९७ उमेदवारांनी बुधवारी नामनिर्देशनपत्रे दाखल केले आहे. जिल्हा परिषदेच्या ८ जागा ३७ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. काही मतदारसंघांमध्ये भाजप अंतर्गत बंडखोरी झालेली आहे. या बंडोखोरांना थंड करण्याचे आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. दरम्यान, गुरुवारी उमेदवारांची अर्ज छाननी कणकवली तहसील कार्यालयात होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवार नाम निर्देशन पत्रे दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात उमेदवारी अर्ज स्वीकरण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश कातकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा दीक्षांत देशपांडे यांनी सकाळपासूनच यंत्रणा सज्ज ठेवली होती. तहसीलदारांच्या दालनात ६ टेबल लावण्यात आली होती. सकाळी ११ वाजण्यापासून राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार तहसील कार्यालयात दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी झाली होती








