नेरूर येथे कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सुरू
कुडाळ : प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजात वावरत असताना तेथील लोकजीवन समजून घ्यावे. श्रमसंस्कार शिबिराच्या रूपाने निसर्गात आणि लोकांमध्ये मिसळण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळत असून तिचा पुरेपूर लाभ घ्यावा. आजच्या पिढीमध्ये श्रमप्रतिष्ठा कमी होत असताना अशा शिबिरांचे आयोजन ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. कोणतेही काम दुय्यम समजू नका, असे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.
कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने नेरूर आयोजित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराला सोमवार पासून सुरूवात झाली. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर बोलत होते. श्री.वालावलकर पुढे म्हणाले की, “रुग्णसेवा म्हणजेच परमेश्वर सेवा” या भावनेतून कार्य करणाऱ्या नर्सेसना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून समाजसेवेची मोठी संधी मिळाली आहे. या संधीचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग करावा. मानवी सेवेसाठी जिवंत मन, वात्सल्य, प्रेम व समर्पणाची भावना आवश्यक असून ती स्वतःमध्ये विकसित करावी. यावेळी त्यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सामाजिक बांधिलकीतून, जिद्दीने व प्रामाणिक प्रयत्नांतून जुन्या इंगेश हॉस्पिटलचे यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्रात अत्याधुनिक सेवा-सुविधांसह केलेले रूपांतर कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या परिश्रमामुळे या रुग्णालयाला मिळालेले नववैभव परिसरातील नागरिकांनी लाभावे, असे आवाहनही श्री.वालावलकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना नेरूरच्या सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर म्हणाल्या, “परमेश्वरभक्तीकडे जाण्याचा मार्ग समाजसेवेतून जातो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून ही संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. समाजसंपर्क वाढवून व्यक्तिमत्त्व विकासासाठी तिचा उपयोग करा आणि राष्ट्रसेवेत सक्रिय सहभाग नोंदवा.” तसेच समाजसेवेचे शिवधनुष्य उचललेल्या उमेश गाळवणकर यांना हे कार्य समर्थपणे पेलता यावे, उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
नेरूरचे उपसरपंच दत्ताराम म्हाडळकर यांनी ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय पुनर्जीवित केल्याबद्दल उमेश गाळवणकर यांचे अभिनंदन केले. तसेच नेरूर ग्रामस्थांच्या सेवेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानले.
संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, हे शिबिर सामाजिक वारसा जपण्याचा मार्ग ठरावा. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोकांची मने जिंका, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हा आणि त्यांचे जीवन समजून घ्या. नेरूर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हे रुग्णालय नवचैतन्याने उभे राहू शकले असून कुडाळ, पिंगुळी व नेरूर ही आमचीच गावे असल्याची भावना ठेवून शक्य तेवढे प्रयत्न व मदत आपण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जीवन समृद्ध करण्यासाठी या शिबिराचा उपयोग करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी यांनी विद्यार्थ्यांना, “शिबिराच्या निमित्ताने या गावातील माणसे समजून घ्या. समाजसेवा व श्रमसंस्काराची सवय अंगी बाणवा,” असे आवाहन केले. प्रा. अरुण मर्गज यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर हे व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्तम व्यासपीठ असून नेतृत्वगुण, सामाजिक समायोजन, संघभावना व कलागुणांचा विकास करण्याचे आवाहन केले. नर्सिंग महाविद्यालयांमध्ये दुर्मिळ असलेला राष्ट्रीय सेवा योजना विभाग सुरू केल्याबद्दल संस्थेचे आभार मानण्याचे त्यांनी सुचविले.
प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी सामाजिक भावना व सेवाभाव जपण्याचे आवाहन करत शिबिराचा उपयोग सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी करावा, असे सांगितले.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाधिकारी प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. वैजयंती नर, प्रा. शंकर माधव, प्रसाद कानडे, अक्षया सामंत, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत पाटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अर्पिता घाडी यांनी मानले.









