अल्पावधीतच नंबर प्लेट तुटू लागल्या
नंबर प्लेट कमकुवत; वाहनधारकांत संताप
दोडामार्ग : प्रतिनिधी
शासनाच्या आदेशानुसार २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. कायद्याची अंमलबजावणी म्हणून वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात या नंबर प्लेट बसवून घेतल्या; मात्र अवघ्या काही दिवसांतच त्या तुटू लागल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निकृष्ट दर्जाच्या प्लेट पुरविल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
राज्यातील २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी High Security Registration Plate (HSRP) सक्तीचे करण्यात आले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत अधिक शुल्क आकारूनही दिलेल्या प्लेटचा दर्जा अत्यंत हलका व कमकुवत असल्याची तक्रार आहे. किरकोळ धक्का, खड्डेमय रस्ते किंवा दैनंदिन वापरातही प्लेट वाकणे, तुटणे किंवा सैल होणे असे प्रकार घडत असल्याचे वाहनधारक सांगत आहेत.
काही दिवसांतच प्लेट वाकल्या, तक्रारींचा वाढता सूर!
कायद्याच्या भीतीपोटी आणि दंड टाळण्यासाठी नागरिकांनी अतिरिक्त आर्थिक भार सहन करत या प्लेट बसवून घेतल्या. मात्र अपेक्षित टिकाऊपणा न मिळाल्याने शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक वाहनधारक संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
संतप्त सवालांची सरबत्ती!
इतर राज्यांपेक्षा अधिक शुल्क आकारूनही दर्जाहीन नंबर प्लेट का देण्यात आल्या? गुणवत्ता तपासणी झाली का? ठेकेदार व संबंधित विभागाची जबाबदारी काय? काही दिवसांत तुटलेल्या प्लेटची हमी कोण घेणार? असे सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केले जात आहेत.
निकृष्ट प्लेट तात्काळ बदलण्याची मागणी!
सुरक्षा व प्रमाणबद्धतेच्या उद्देशाने एचएसआरपीची सक्ती करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात वाहनधारकांना आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. शासनाने तातडीने लक्ष देऊन निकृष्ट प्लेट बदलून उच्च दर्जाच्या प्लेट उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.









