ठळक घडामोडी

पावशी जि.प. मतदारसंघात महायुतीचा प्रचार वेगात; दादा साईल–कांदळगावकरांचा जनसंवादावर भर!

झंझावाती प्रचार फेरीतून महायुतीचा विकास अजेंडा मतदारांपर्यंत

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महायुतीचा विजय निश्चित – साईल, कांदळगावकर

कुडाळ : प्रतिनिधी
      पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना–भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल आणि डिगस पंचायत समितीचे उमेदवार निखिल कांदळगावकर यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, प्रचाराने वेग घेतला आहे. थेट जनसंवादावर भर देत दोन्ही उमेदवार मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा वचननामा मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत.
      प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवार दादा साईल व निखिल कांदळगावकर यांनी व्यक्त केला. त्यांनी पणदूर, अणाव, हुमरमळा व डिगस या गावांत झंझावाती प्रचार फेरी काढून ग्रामस्थ व मतदारांशी थेट संवाद साधला. याशिवाय जि.प. मतदारसंघातील पावशी, बांव, बांबुळी, सोनवडे आदी सर्वच गावांत दादा साईल यांनी प्रचार फेऱ्या काढत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विकासाचा ठोस अजेंडा मांडताना जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने जनता निश्चितच महायुतीच्या बाजूने ठामपणे उभी राहील, असा विश्वास साईल आणि कांदळगावकर यांनी व्यक्त केला. महायुतीच्या वतीने मतदारसंघात घराघरांत वचननामा पोहोचवला जात आहे. या वचननाम्यात पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराची हमी देण्यात आली असून, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, पाणीपुरवठा व स्वच्छतेत उत्कृष्टता, कृषीविकासातून शेतकऱ्यांना सन्मान, महिला व बालकल्याणासाठी कटिबद्धता, रोजगार व कौशल्य विकासातून युवकांचे सक्षमीकरण तसेच रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश करण्यात आला आहे.

error: Content is protected !!