अभिनेते संजय दत्त, गायक सोनू निगम यांचा लाईव्ह शो
कणकवलीत राजकीय,विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
कणकवली : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात येत्या १० एप्रिल रोजी होत असून, त्यानिमित्त जिल्हा भाजपच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी पदार्पण सोहळा कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात सायंकाळी ६ वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या भव्य कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर यानंतर रात्रौ संजय दत्त, गायक सोनू निगम यांचा लाईव्ह शो देखील जिल्हावासीयांना पाहता येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रहार भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
श्री. सावंत पुढे म्हणाले की, हा सोहळा केवळ पक्षीय न राहता सर्वसमावेशक असेल. विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नसून, त्याऐवजी वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी पुस्तक भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील प्रकाशकांशी याबाबत चर्चा सुरू असून, कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जमा झालेली सर्व पुस्तके जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांना भेट स्वरूपात दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तसेच अशोक सावंत, मनोज रावराणे, समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होते.









