ठळक घडामोडी

कुडाळमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडर तुटवडा; हॉटेल व्यावसायिक संतप्त!

“गॅस नसेल तर पर्यटकांना जेवण कसे देणार?” – व्यावसायिकांचा संतप्त सवाल

गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्यास हाॅटेल बंद ठेवण्याची वेळ; व्यावसायिकांनी घेतली तहसीलदारांची भेट

कुडाळ : प्रतिनिधी
       गेल्या तीन दिवसांपासून कमर्शियल (व्यावसायिक) गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने बुकिंग अचानक बंद आहे, त्यामुळे व्यावसायिकांना सिलिंडर मिळणे कठीण झाले असून याबाबत कुडाळमधील हॉटेल व्यावसायिक आणि छोटे उद्योजक संतप्त झाले आहेत. या प्रश्नावर आज व्यावसायिकांनी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. “जर सिलिंडर मिळणार नसेल, तर पर्यटकांना जेवण कसे द्यायचे आणि कामगारांचे पगार कसे करायचे?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
        व्यावसायिकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांनी सांगितले की, “व्यावसायिक सिलिंडर संदर्भात शासनाकडून कोणतीही नवीन गाईडलाईन अद्याप प्राप्त झालेली नाही.” तरीही तोडगा काढण्याबाबत प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरू आहे.
     तर सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून सध्या अनेक पर्यटकांनी हॉटेल बुकिंग करून ठेवले आहे. हॉटेलमध्ये पर्यटक असतानाच गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली आहे. “उद्यापासून हॉटेल बंद करण्याची वेळ आमच्यावर येणार आहे,” असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.
    खरेदी-विक्री संघाशी समन्वय साधून गॅसचा पुरवठा तातडीने पूर्ववत करावा. तसेच जोपर्यंत कमर्शियल सिलिंडर उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत हॉटेल व्यवसायासाठी घरगुती सिलिंडर वापरण्याची तात्पुरती मुभा द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन नायब तहसीलदार जाधव यांनी तत्काळ खरेदी-विक्री संघाशी संपर्क साधला. मात्र, “सिलिंडरची गाडी गेली आहे, पण अद्याप स्टॉक प्राप्त झाला नसल्याने सिलिंडर उपलब्ध नाहीत,” अशी माहिती संघाकडून देण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेण्याचे आश्वासन नायब तहसीलदारांनी दिले आहे.
      गॅस तुटवड्याचे हे संकट लवकर न सुटल्यास कुडाळसह संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी अमित सुकी, अवधूत शिरसाट, रुपेश पावसकर, संतोष शिरसाट, संजय भोगटे, नगरसेवक मंदार शिरसाट, पंकज कामत, रत्नाकर प्रभू, नितीन परब, श्रीराम शिरसाट, बंड्या सावंत, प्रसाद मालवणकर, संतोष आईर, श्री. धोंड, रितेश परब, गुरु कोरगावकर, शशांक जडये, सिद्धेश तानावडे, गणेश हरमलकर, यश नाईक, मनोज कुडाळकर आदी व्यावसायिक उपस्थित होते.

error: Content is protected !!