ठळक घडामोडी

कुडाळमध्ये थकीत मालमत्तांवर कारवाई, ८ मालमत्ता सील!

कर न भरल्याने नगरपंचायतीची धडक मोहीम; जप्ती पथक तैनात

कुडाळ : प्रतिनिधी
     कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने विशेष कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मार्च अखेर जवळ आल्याने नगरपंचायतीच्या कर वसुली मोहीमेने वेगाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी नगरपंचायत प्रशासनाने शहरातील मालमत्ता कर थकविणाऱ्या एकूण ८ मालमत्ता सील करण्याची कारवाई केली. याबाबतची माहीती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.
    मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना यापूर्वीच मालमत्ता जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. थकीत कराचा भरणा न केल्यास मालमत्ता जप्त करण्यात येतील, असा इशारा देत थकीत तसेच चालू आर्थिक वर्षाचा कर तातडीने भरावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यानुसार थकीत मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी नगरपंचायतीने विशेष जप्ती पथक तैनात केले असून, या पथकामार्फत शहरात महिनाभर कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे. बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत नगरपंचायत हद्दीतील एकूण आठ मालमत्ता सील करण्यात आल्या.
ही कारवाई कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी सागर पाटील तसेच जप्ती पथक प्रमुख व कर निर्धारण अधिकारी राजू पठाण, कर सहाय्यक दत्ताराम म्हाडेश्वर, वसुली कर्मचारी रोहित परब, मंदार सावंत, केतन पवार, प्रविण कोरगावकर आणि सतीश जाधव यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!