ठळक घडामोडी

मालवण तालुक्यात शांततेत मतदान, सरासरी ५० टक्के मतदान

मालवण : प्रतिनिधी
      मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समिती मतदारसंघांसाठी आज शनिवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मालवणात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला, त्यामुळे तालुक्यात सरासरी ५० टक्के एवढे मतदान झाले. उमेदवारांचे भावितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून ९ तारखेला निकाल स्पष्ट होणार आहे.
     जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मालवण तालुक्यात मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत केवळ २० टक्के इतकेच मतदान झाले होते. मात्र ३ वाजल्या नंतर मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या. साडेतीन वाजेपर्यंत हा टक्का ४७ वर पोहोचला आणि शेवटच्या टप्प्यात सायंकाळी ५. ३० वाजे पर्यंत सरासरी ५० टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली.
      कुंभारमाठ घुमडे या मतदान केंद्रावर श्रीकांत चव्हाण या नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. तर सर्जेकोट येथील ज्येष्ठ मच्छिमार दादा सावजी यांनी हॉस्पिटलमधून आयसीयुतून थेट सर्जेकोट मतदान केंद्रावर दाखल होत मतदान केले. सर्जेकोट येथील प्राथमिक शाळेतील सखी मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली.
      ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने चोख नियोजन केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार व तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
     मालवण तालुक्यात ६ जिल्हा परिषद जागांसाठी १३, तर ११ पंचायत समिती जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून येत्या ९ तारखेला मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे निकाल जाहीर होणार आहे.

error: Content is protected !!