

शिवज्योत, रॅली, लेझीम नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम
शिवजन्मोत्सव सोहळ्यासह पारंपरिक वेशभूषा
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ येथे गुरुवारी अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. लहान मुलांनी साकारलेली शिवकालीन वेशभूषा विशेष लक्षवेधी ठरली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवराय” अशा जयघोषात शहरासह संपूर्ण तालुक्यात शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कुडाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील शिवरायांच्या पुतळ्याला जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व शिवप्रेमी नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. कार्यक्रमाची सुरुवात मालवण किल्ल्यावरून शिवज्योत आणून करण्यात आली. ही शिवज्योत कट्टा मार्गे ओरोसफाटा येथे दाखल झाल्यानंतर तेथे शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कुडाळ एमआयआरएम कॉलेज येथून राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज नगर अशी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी बिबवणे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, तालुकाध्यक्ष संतोष परब, युवा तालुकाध्यक्ष शैलेश घोगळे, शहर अध्यक्ष योगेश काळप, बंड्या सावंत, सचिन काळप, नगरसेवक विलास कुडाळकर व अॅड.राजीव कुडाळकर, सौ.रेवती राणे, सौ.अदिती सावंत, धीरज परब, वैभव जाधव, विनय गायकवाड, आशिष काष्टे आदींसह मराठा समाज बांधव, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवात ग्रुप डान्स, लहान मुलांचे नृत्य, पारंपरिक वेशभूषा सादरीकरण, मान्यवरांचे स्वागत, ‘गर्जा जयजयकार’ सादरीकरण तसेच पारंपरिक वेशभूषा फॅशन शो आदी कार्यक्रमांचा समावेश होता. सिद्धिविनायक ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मालवण ते कुडाळ अशी शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी शहरातील विविध शिवजयंती उत्सवांना भेट दिली.
कुडाळ माठेवाडा येथे स्वराज्य मित्र मंडळातर्फे शिवजयंती सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तसेच सखे सोबती मित्रमंडळ पिंगुळी यांच्या वतीनेही आनंदवन संकुल, पिंगुळी येथे शिवजयंती सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. हा उपक्रम साईकला मंच पिंगुळी, सखे सोबती मित्रमंडळ तसेच गावातील विविध मित्रमंडळे व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. श्री शिव छत्रपती प्रतिष्ठान (डिगस) यांच्या वतीने डिगस येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. लहान मुलांनी साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.









