दोन वाहनांमधून मार्ग काढताना अपघात; स्कुटर चालक जखमी
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग शहराच्या बाजारपेठेत शुक्रवारी दुपारी एक विचित्र अपघात घडला. दोन उभ्या वाहनांच्या मधून स्कुटर चालक मार्ग काढत असताना मागून येणाऱ्या डंपरने स्कुटरला धडक दिली. या अपघातात स्कुटर चालक जखमी झाला असून त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दोडामार्ग बाजारपेठेत नगरपंचायतीचा कचरा संकलन करणारा ट्रॅक्टर उभा होता, तर दुसऱ्या बाजूला कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो उभा होता. याच दरम्यान एक युवक या दोन्ही वाहनांच्या मधून दुचाकी नेत असताना मागून येणाऱ्या डंपरने त्याच्या स्कुटरला जोरदार धडक दिली. धडकेमुळे स्कुटर चालक थेट बाजूला उभ्या असलेल्या नगरपंचायत ट्रॅक्टरच्या चाकाला आपटून रस्त्यावर कोसळला. मात्र ट्रॅक्टर उभा असल्याने स्कुटर चालक ट्रॅक्टरखाली जाण्यापासून बचावला आणि मोठा अनर्थ टळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीला रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने जखमी स्कुटर चालकाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.







