ठाकरे शिवसेनेचा जाब; शिवापुरातून महिला पदाधिकाऱ्यांचा काढता पाय
माणगांव : प्रतिनिधी
माणगांव (ता. कुडाळ) खोऱ्यातील शिवापुर गावात महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अधिकृत सूचना नसताना स्वतःला ‘लाडक्या बहिणी’ समजणाऱ्या काही महिला पदाधिकारी घरोघरी फिरून महिलांकडून लाडकी बहिण योजनेचे खोटे अर्ज भरून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित महिलांना अडवून थेट जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार तू-तू मै-मै झाली. मात्र संबंधित महिला पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही समर्पक उत्तर मिळाले नाही.शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक होताच त्या महिलांनी अखेर माणगांव खोऱ्यातील शिवापुर गावातून काढता पाय घेतला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहिण योजनेचा गैरवापर करून महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.त्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
लाडकी बहिण योजना ही जनतेने कररूपाने भरलेल्या पैशातून सुरू आहे. हे पैसे कोणताही नेता स्वतःच्या खिशातून देत नाही, असे स्पष्ट शब्दांत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संबंधित महिलांना सुनावले.या घटनेमुळे माणगांव खोऱ्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अशा फसवणुकीच्या प्रकारांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.








