महायुतीचे दिग्गज नेतेमंडळी, पदाधिकारी उपस्थित राहणार
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
जि.प. व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, त्यांची जाहिर प्रचारसभा बुधवार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील मैदानावर होणार आहे. या सभेला महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहीती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून लढवत आहोत. महायुतीत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) घटकपक्ष सहभागी असून या महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या ५० जागा आणि पंचायत समितींच्या १०० जागा लढवल्या जात आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा कणकवलीत २८ जानेवारीला होत आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आदींसह नेतेमंडळी उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. या सभेला जिल्ह्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.









