कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे पात्र लाभार्थ्यांना आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ दिला जात आहे. मात्र तालुक्यातील काही पात्र शिधापत्रिकाधारकांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज सादर केलेले नसल्याने त्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ४४,००० व शहरी भागातील वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ५९,००० पर्यंत असलेल्या कुटुंबांना लाभ मिळू शकतो. पात्र लाभार्थ्यांना दरमहा मोफत ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मिळू शकतो. तथापि, तालुक्यातील काही पात्र शिधापत्रिकाधारकांनी अद्याप या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज तहसील कार्यालयात सादर केलेले नाहीत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी कुडाळ तहसील कार्यालयात लवकरात लवकर अर्ज दाखल करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज सादर करताना शिधापत्रिकेची छायांकित प्रत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असल्याचेही तहसील प्रशासनाने कळविले आहे. तालुक्यातील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.






