ठळक घडामोडी

मुंबई–विजयदुर्ग एम टू एम रो-रो सेवेचे विजयदुर्गात जल्लोषात स्वागत!

देवगड : प्रतिनिधी
       कोकणवासीयांची प्रतीक्षा संपवत मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू करण्यात आलेली एम टू एम रो-रो जलवाहतूक सेवा आज विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सिंधुदुर्गवासीयांनी बंदर परिसरात मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सुमारे ४ वाजता बोट जेटीला लागल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत प्रवाशांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
     या सेवेचा शुभारंभ सकाळी मुंबई येथील भाऊचा धक्का येथे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर बोट प्रवाशांसह विजयदुर्गकडे रवाना झाली. पहिल्याच दिवशी विविध श्रेणीतील बहुतांश तिकिटे बुक झाली होती.
६२६ प्रवासी व मोठ्या संख्येने वाहने नेण्याची क्षमता असलेल्या या अत्याधुनिक रो-रो जहाजाने मुंबई–विजयदुर्ग अंतर अवघ्या आठ तासांत पूर्ण केले. पहिल्या फेरीत ३९० प्रवासी, ४१ चारचाकी व १७ दुचाकींसह बोट विजयदुर्गात दाखल झाली.
     विजयदुर्ग जेटी फुलांनी सजवण्यात आली होती. या पहिल्या जलवाहतूक प्रवाशांवर फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले. विजयदुर्ग ग्रामपंचायत प्रभारी सरपंच रियाज काझी यांनी प्रवाशांचे स्वागत केले.
या सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती घोडमीसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिसर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी राज्यमंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
     विजयदुर्ग येथे उतरलेल्या प्रवाशांसाठी कणकवली व देवगड मार्गे एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवाशांनी हा प्रवास सुखकारक, सुरक्षित व वेळेची बचत करणारा असल्याची प्रतिक्रिया दिली. कोकणातील सागरी वाहतुकीसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरल्याचे मत व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!