ठळक घडामोडी

नववर्ष स्वागतासाठी सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी!

मालवण-देवगड-वेंगुर्ला समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले

मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)
      नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषतः मालवण, देवगड आणि वेंगुर्ला तालुक्यांतील प्रसिद्ध समुद्रकिनारे पर्यटकांनी अक्षरशः गजबजून गेले असून, सागरी पर्यटनाचा आनंद घेत पर्यटक सुटीचा मनमुराद आस्वाद घेत आहेत.
   मालवण तालुक्यातील तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, वायरी, आचरा, तोंडवळी हे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. त्याचप्रमाणे वेंगुर्ला तालुक्यातील वेळागर–शिरोडा, तर देवगड तालुक्यातील मिठमुंबरी आणि कुणकेश्वर किनाऱ्यांवरही पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. मालवणमधील त्सुनामी आयलँड, ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, निवती रॉक्स बेटे, जय गणेश मंदिर, राजकोट किल्ला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे ठरत आहेत.
   जलक्रीडा प्रकारांप्रमाणे स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राइड, बंपर राईड, बोटिंग सफारी, आणि स्नॉर्कलिंगला पर्यटकांच्या उड्या पडत आहेत. तारकर्ली खाडीत बॅक वॉटर बोटिंग करणे एक वेगळाच अनुभव आहे. डॉल्फिन सफारी साठी मोठी मागणी आहे.
   मालवणी खाद्य संस्कृती सर्वत्र प्रसिद्ध आहे. खास करून मालवणी जेवण. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे माशांचे रेट वाढले आहेत. सुरमई, पापलेट, प्राँन्स, या माशांना मोठी मागणी आहे. या पदार्थांचाही पर्यटक आनंद घेत आहेत. निवास व्यवस्था फुल्ल झाल्या असून, स्वच्छतागृहे, पाणी आणि पार्किंग अपुऱ्या पडत आहेत. पर्यटन व्यावसायिकांनी मूलभूत सुविधा वाढवण्याची मागणी केली आहे. पर्यटन वाढीचे कारणनाताळ सुटी आणि नववर्ष सणांच्या जोरदार सेलिब्रेशनमुळे देश-विदेशातील पर्यटक कोकणाकडे वळले आहेत. दिवाळी हंगामातील पावसाचा फटका बसल्यानंतर हा हंगाम गजबजला आहे.
    वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम
    मालवणात दरवर्षी पर्यटन हंगामात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र  पार्किंगची गैरसोय आणि वाहतूक कोंडी होत असताना नगरपलिका व पोलीस यंत्रणा यांच्याकडून कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. शहराची वाहतूक व्यवस्था रामभरोसे आहे.

error: Content is protected !!