ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीकडून शिष्यवृत्ती प्रदान
कुडाळ : प्रतिनिधी
ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत डिगस माध्यमिक विद्यालय, डिगस येथील गुणवंत व होतकरू गरजू विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी विद्यार्थ्यास ३ हजार ६०० रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आली.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सुशांत सूर्यकांत चव्हाण, अंजली अनंत पवार, आर्या आबा धुरी आणि ईशा चंद्रशेखर सावंत यांचा समावेश आहे. या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून त्यांच्या शिक्षणातील सातत्य टिकविण्यास मोठा हातभार लागणार आहे. मुख्याध्यापिका अनुजा अमरसेन सावंत यांनी ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी संस्थेसह व्यवस्थापक प्रसाद परब यांचे आभार मानताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा देणारी दीपज्योती आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. संस्थेची समाजाप्रती असलेली बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संस्था, पालक व शिक्षकांनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन उज्ज्वल यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.







