ठळक घडामोडी

आमदार निलेश राणेंची तत्परता; तेंडोली शाळा दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध!

शाळेच्या छप्पर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

पालकांसह ग्रामस्थांनी मानले आभार

कुडाळ : प्रतिनिधी
          कुडाळ तालुक्यातील तेंडोली – गावठणवाडी जि. प. प्राथ. शाळेच्या छप्पराचा भाग कोसळल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत शिंदे शिवसेनेचे तेंडोली उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. आमदार निलेश राणे याची तातडीने दखल घेत तत्परता दाखवली. आमदार राणे आणि जिल्हाप्रमुख सामंत यांच्या माध्यमातून तात्काळ शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून कामालाही प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे, अशी माहिती श्री. राऊळ यांनी दिली
    या शाळेच्या छप्पराचा भाग कोसळल्याची घटना 9 जानेवारी रोजी घडली होती. त्यानंतर संबधीत प्रशासनाने मुलांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या गंभीर प्रकाराची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांना शाळेसमोरील अंगणात भर उन्हात शाळा भरवित आंदोलन छेडले होते. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत पालकांशी चर्चा करीत शाळेचे छप्पर दुरुस्त होईपर्यंत मुलांना खासगी मालकीच्या इमारतीत बसविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार खासगी इमारतीत मंगळवारपासून शाळा सुरु करण्यात आली.
मात्र घडलेल्या घटनेची माहिती आमदार श्री. राणे यांना देण्यात आली. श्री. राणे यांनी गंभीर दखल घेत आ.राणे आणि जिल्हाप्रमुख सामंत यांच्या माध्यमातून इमारतीच्या छप्पराबाबत आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यानुसार शाळेला छप्पराचे साहित्य पुरविण्यात आले. शाळेच्या दुरुस्तीसाठी तात्काळ पावले उचलल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी श्री.राणे यांचे आभार मानले.

error: Content is protected !!