‘छोटे कलाकार, मोठा रंगमंच’ संकल्पना; चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचा नवा प्रयोग
२१ बालकलाकारांचा असणार सहभाग
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ मधील चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने व उद्योजक उमेश पाटील यांच्या सहकार्याने अप्सरा हा नवा डान्स शो रविवार दि. ११ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता मराठा समाज हाॅल सभागृह, कुडाळ येथे सादर होणार आहे. “छोटे कलाकार, मोठा रंगमंच” या टॅग लाईनखाली हा कार्यक्रम होणार असून यात २१ लहान मुलांचा सहभाग आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे, अशी माहीती चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनील भोगटे व संस्थापक अध्यक्ष रवि कुडाळकर यांनी मंगळवारी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
सल्लागार सुनील भोगटे म्हणाले,चिमणी पाखरं डान्स अकॅडमीने नेहमीच मुलांना केवळ नृत्याचे शिक्षण न देता त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अप्सरा या नव्या डान्स शोच्या माध्यमातून लहान कलाकारांना मोठ्या रंगमंचावर सादरीकरणाची संधी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी २१ लहान कलाकारांचा चमू सज्ज असून निर्माते उमेश पाटील यांची सुकन्या कृपा पाटील हिने इतर सहकारी कलाकारांचा संच तयार केला आहे. नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर यांनी यापूर्वी तारकासारखे यशस्वी कार्यक्रम राबवले असून अप्सरालाही तितकाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला उमेश पाटील यांच्यासह सर्व पालकांचेही सहकार्य मिळाले आहे, असे ते म्हणाले. नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.भोगटे व श्री. कुडाळकर यांनी केले आहे. यावेळी पालक मुमताज शेख, स्वरा सावंत, विजयश्री अणावकर, विविधा जाधव, मृणाली कुडाळकर आदींसह पालक व बालकलाकार उपस्थित होते.









