

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा पुढाकार
मालवण : प्रतिनिधी
मालवण शहरातील सुप्रसिद्ध मामा वरेरकर नाट्यगृह व परिसराची सोमवारी पाहणी करत असताना उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या निदर्शनास नाट्यगृह परिसरातील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, काचेच्या बाटल्या तसेच विविध प्रकारचा कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कचरा टाकला जाणे ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत उपनगराध्यक्ष पाटकर यांनी तत्काळ स्वच्छतेचे काम हाती घेतले. मंगळवारी सकाळी त्यांनी स्वतःच्या खर्चातून विहिरीतील गाळ व साचलेला कचरा काढून संपूर्ण विहीर स्वच्छ करून घेतली. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ व प्लास्टिकमुळे विहिरीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती.
भविष्यात पुन्हा कोणीही विहिरीत कचरा टाकू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विहिरीवर ग्रीन मॅट टाकण्यात आली. त्यामुळे विहिरीचे संरक्षण होऊन परिसरातील स्वच्छता अबाधित राहण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी पाटकर यांनी नमूद केले. या स्वच्छता मोहिमेदरम्यान उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या समवेत सुभाष कुमठेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत करत पाटकर यांच्या तत्परतेचे व सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.









