ठळक घडामोडी

कर्ली खाडी पात्रात अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई!

दोन फायबर होड्या बुडवल्या; १० ते १२ रॅम्प उद्ध्वस्त

कुडाळ महसूल प्रशासनाचा दणका; वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथील कर्ली खाडी पात्रात शुक्रवारी पहाटे अवैध वाळू उत्खनन सुरू असताना कुडाळच्या महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूने भरलेल्या दोन फायबर होड्या जेसीबीच्या सहाय्याने बुडविण्यात आल्या असून, १० ते १२ रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले.
  अवधैरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारीनंतर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास छापा टाकला. पथक येत असल्याची चाहूल लागताच वाळू चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या कारवाईत पिंगुळी मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव, तलाठी स्नेहल सागरे व श्री. राठोड, पोलीस पाटील सुरेश नाईक व सत्यजित गावडे सहभागी होते. कुडाळ पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव व पोलीस कर्मचारी अविनाश गायतोंडे यांचे सहकार्य लाभले. काही दिवसांपूर्वीही कर्ली नदी पात्रालगत वालावल, नेरूर–नाईकवाडी, चेंदवण, कवठी व सरंबळ परिसरात २५ अवैध रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले होते. महसूल प्रशासनाच्या या धडक कारवाईच्या सत्रामुळे वाळू व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

error: Content is protected !!