ठळक घडामोडी

भजनी कलाकारांसाठी योजनांसह सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे

कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन

पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार

कणकवली : प्रतिनिधी
     कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील चार वर्षांत भजनी कलाकारांसाठी अधिकाधिक योजना, मानधन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. भजन सदन उभारणी, कलाकार मानधन वाढ, तसेच पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. भजनी कलाकारांना न्याय व ओळख मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास मंत्री राणे यांनी दिला.
       भजनी कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळावा, या उद्देशाने कणकवली येथे आयोजित ‘तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचा’ उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पालकमंत्री नाम. नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
    राज्याचे सांस्कृतिक मंत्री आपल्या कोकणातीलच आहेत. तसेच मंत्रिमंडळात माझ्या शब्दाला वजन असल्याने, पुढील चार वर्षांच्या काळात भजनी कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आपल्याकडे काम थांबवणारे विरोधकच उरले नसल्याने, आपण जास्तीत जास्त विधायक काय घडवू शकतो, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा विश्वास पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
    कणकवली येथे आयोजित ‘तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या’ उद्घाटन सोहळ्यात मंत्री नीतेश राणे बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, भजनी कलाकार समितीचे अध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष प्रकाश पारकर, माजी सभापती बुलंद पटेल, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
    नीतेश राणे म्हणाले, भजनी कलाकार समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संतोष कानडे यांनी आपल्या पदाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. वारकरी संप्रदाय आणि भजनी कलाकारांना सरकारशी जोडणारा एक भक्कम दुवा म्हणून ते कार्यरत आहेत. योग्य व्यक्तीच्या हाती नेतृत्व गेल्यावर संस्थेचा कायापालट कसा होतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांच्या प्रश्नांसाठी संतोष कानडे सातत्याने पाठपुरावा करत असतात. प्रत्येक अधिवेशनात ते कलाकारांच्या मागण्या घेऊन माझ्याकडे येतात. महाराष्ट्रातील इतर कलां प्रमाणेच कोकणातील या समृद्ध भजन संस्कृतीची दखल सरकारने घेणे आवश्यक आहे. सरकारकडे देण्याची क्षमता मोठी आहे, फक्त त्यांना या गोष्टींची जाणीव करून देणारे नेतृत्व हवे असते, असे मंत्री राणे म्हणाले.

error: Content is protected !!