श्रींच्या दर्शनासाठी भाविक – भक्तांची गर्दी
मंदिर परिसर भक्तिरसात निघाला न्हाऊन

कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील जागृत देवस्थान श्री देव गवळदेव पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव आज गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा होत आहे. जत्रोत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडले. सायंकाळी हरिपाठ, सांज आरती व भजन कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला.
रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार असून, रात्री ठीक १२ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, वालावल यांचे दशावतारी नाटक सादर करण्यात येणार आहे. जत्रोत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
याशिवाय जत्रोत्सवाच्या निमित्ताने परिसरात खाद्यपदार्थ, खेळणी व गृहपयोगी साहित्यांची दुकाने थाटण्यात आली असून नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. श्री गवळदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची सतत ये-जा सुरू असून जत्रोत्सव उत्साहात सुरू आहे.










