जागा वाटप फॉर्म्युल्यानंतर भाजप पाठोपाठ शिंदे गटात नाराजीनाट्य
दोन दिवसांत पुढील निर्णय जाहीर करणार – वर्षा कुडाळकर
कुडाळ : प्रतिनिधी
जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर ओरोस मंडळातील भाजपाच्या मंडल अध्यक्ष भाई सावंत यांच्यासह ४३ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यापाठोपाठ आता कुडाळमध्ये शिंदे शिवसेनेतही नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडी ओबीसी व्हिजेएनटी सेलच्या जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी राजीनामा दिला आहे. पक्ष सदस्यासह पदाचा राजीनामा देत असल्याची माहीती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपली कोणावरही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत आपण पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. वर्षा कुडाळकर आता काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









