बचतगटांसाठी पर्वणी; ७५ स्टॉल्स सहभागी; भरगच्च कार्यक्रम
जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपाध्यक्ष दादा साईल यांची माहीती
कुडाळ : प्रतिनिधी
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत सिंधुदुर्ग सरस महोत्सव २०२६ चे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव शनिवार दि. २१ ते बुधवार २५ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत कुडाळ येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. जिल्ह्यातील बचत गटांचे ७५ स्टॉल्स सहभागी झाले असून, विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीती जि.प.चे अध्यक्ष प्रमोद कामत व उपाध्यक्ष दादा साईल यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जि.प.उपाध्यक्ष दादा साईल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जि.प.सदस्य दीपलक्ष्मी पडते, रुपेश पावसकर, नागेश आईर, पं.स.सदस्य निखिल कांदळगावकर, श्री.म्हाडेश्वर, अर्चना घावनळकर, उमेदचे तालुका समन्वयक गणेश राठोड आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या सिंधुसरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात जिल्हाभरातील महिला बचत गटांकडून विविध खाद्यपदार्थ, काजू, आंबा, मसाले, हातमाग उत्पादने तसेच इतर ग्रामीण उत्पादने यांचे ७५ स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.
महोत्सवाच्या उद्घाटनदिनी (२१ मार्च) बचत गटांच्या महिलांची उपस्थिती अपेक्षित असून, विविध स्पर्धा व सायंकाळी समूह नृत्य सादर होणार आहे. २२ मार्च रोजी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतीविषयक शिबिरे आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ मार्चला बँकिंग व ग्रामपंचायत विषयक कार्यशाळा, महिला गट नृत्य स्पर्धा आणि रात्री पारंपरिक दशावतार नाट्य सादर होणार आहे.
२४ मार्च रोजी महिला व बाल विकास आणि आरोग्य विषयक कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक सादरीकरणे होतील. तर २५ मार्च रोजी बक्षीस वितरण समारंभ, आढावा बैठक आणि महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे. या महोत्सवाला सिंधुदुर्गवासियिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जि.प. अध्यक्ष कामत व उपाध्यक्ष साईल यांनी केले आहे.









