मांडकुलीत प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ठाकरे शिवसेनेची फौज मैदानात
गंगाराम सडवेलकर, ममता राऊळ व कृष्णा धुरी यांचा गावागावात जोरदार प्रचार
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, गावागावात प्रचार फेऱ्या, बैठका व थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी मांडकुलीसह परिसरातील विविध भागांत ठाकरे शिवसेनेची झंझावाती प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सहभाग घेतला.
पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातील जि.प. उमेदवार गंगाराम सडवेलकर, पिंगुळी पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार ममता राऊळ तसेच साळगाव पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार कृष्णा धुरी यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत पक्षाची भूमिका, विकासाचा दृष्टिकोन व स्थानिक प्रश्न मांडले.
यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा पक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम व प्रामाणिक प्रतिनिधी निवडून दिल्यास विकासाला निश्चित गती मिळेल. त्यामुळे मतदारांनी विकास व जनहिताचा विचार करून ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रचार फेरीत युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, मांडकुली उपसरपंच तुषार सामंत, साळगाव येथील कार्यकर्ते बंड्या कोरगावकर, शाखाप्रमुख नामदेव तावडे, मांडकुलीतील कार्यकर्ते सिद्धेश धुरी, निलेश सामंत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.









