

पोलीस स्थापना दिनानिमित्त कुडाळात विशेष मार्गदर्शन मेळावा
नागरिक, पोलीस पाटील व NCC विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कुडाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने स्थानिक नागरिक, पोलीस पाटील तसेच एनसीसी (NCC) विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शस्त्रास्त्रांची माहिती, सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती आणि महिला सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कुडाळ पोलिस ठाणे येथे शनिवारी दुपारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक सचिन वायताडे, संजय कदम, सायबर क्राईम विभागाच्या निकिता परब, भरोसा सेलच्या सुनीता कोकरे, महेश पावसकर यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील, नागरिक व एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात पोलिसांनी पोलीस दलात वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांची माहिती दिली. बंदुका कशा हाताळायच्या, त्यांचा वापर कोणत्या परिस्थितीत केला जातो, तसेच जमाव हिंसक झाल्यास किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्यास परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवावे, याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. दहशतवादी कारवाया किंवा घुसखोरीसारख्या गंभीर घटनांच्या वेळी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि पोलिसांना कशी मदत करावी, याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर सायबर क्राईम विभागाच्या निकिता परब यांनी विशेष मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, फेसबुक व इंस्टाग्रामसारख्या माध्यमांवर होणाऱ्या फसवणुका, तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी (OTP) शेअर करू नये, याबाबत त्यांनी नागरिकांना सतर्क केले.
महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने भरोसा सेलच्या सुनीता कोकरे यांनी महिलांची फसवणूक टाळण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर उपाययोजनांची माहिती दिली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी ‘डायल ११२’ या हेल्पलाईन क्रमांकाबाबत महेश पावसकर यांनी माहिती दिली.
या मार्गदर्शन मेळाव्यात ज्येष्ठ नागरिक व पोलीस पाटील यांनी आपल्या शंका व प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांचे समाधान केले.










