आरोग्य, पाणी, क्रीडा, स्वच्छता व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून सभागृहात सादरीकरण
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायत च्या विशेष सभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा शिल्लकी रकमेचा अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी सभागृहात सादर केला. सदर अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी विनायक औंधकर तसेच सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल स्वप्निल पाटील यांनी केले.
या अंदाजपत्रकाची प्रारंभिक शिल्लक रक्कम ३७ कोटी ८१ लाख ५९ हजार ८४८ रुपये इतकी आहे. एकूण महसुली जमा १० कोटी ३० लाख ५२ हजार ५०० रुपये तर महसुली खर्च १० कोटी २७ लाख ४१ हजार ७४९ रुपये आहे. भांडवली जमा २५ कोटी ४४ लाख ५६ हजार ५०० रुपये असून भांडवली खर्च २५ कोटी ३२ लाख १८ हजार ५०० रुपये इतका आहे. अखेरीस ३७ कोटी ९७ लाख ०८ हजार ५९९ रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सभागृहाने सर्वानुमते संमत केला.
या अर्थसंकल्पात आरोग्य, पाणीपुरवठा, क्रीडा, स्वच्छता, महिला व बालकल्याण, दिव्यांग बांधव सक्षमीकरण तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच चौक सुशोभीकरण, मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शहर प्रवेशद्वार उभारणी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, कचरा डेपो, नाट्यगृह बांधकाम, हायमास्ट दिवे खरेदी, पाणी योजनांसाठी निधी, सक्शन मशीन खरेदी, रस्ता दुरुस्ती, नवीन कचरा संकलन वाहने, भाजी मार्केट, सुसज्ज जिमखाना, नाना-नानी पार्क, बायोगॅस प्लांट, नवीन उद्यान, मलनिस्सारण योजना, मच्छी मार्केट आदी विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नागरिकांच्या अवलोकनासाठी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.









