ठळक घडामोडी

नेरूर येथे २८ मार्चला मोफत महाआरोग्य शिबिर; आरोग्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

बेळगाव केएलई रुग्णालयाच्या १४२ डाॅक्टरांची टिम राहणार उपस्थित

सिंधुदुर्गातील नागरिकांनी लाभ घेण्याचे डाॅ.अल्लमप्रभू कुडची व उमेश गाळवणकर यांचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
          केएलई विद्यापीठ संचलित डॉ.प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर (बेळगाव), बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, जि.प. आरोग्य विभाग व इतर विविध संस्थांच्या संयुक्त वतीने नेरूर (ता.कुडाळ) येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे शनिवार दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात बेळगाव येथील केएलईमधीव १४२ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहून विविध आजारांची तपासणी करणार आहेत. याबाबतची माहीती कुडाळ येथे आज आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला केएलई रुग्णालयाचे व्यवस्थापकीय अधिकारी डाॅ.अल्लमप्रभू कुडची, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्यासह प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
         शिबिरात हृदयरोग, मेंदू व मज्जासंस्था, मधुमेह, सामान्य शस्त्रक्रिया, छाती व श्वसन रोग, पचनसंस्था, कान-नाक-घसा, दंत व मुख-जबडा शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, कर्करोग तपासणी, मूत्ररोग व मूत्रपिंड रोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग अशा विविध आजारांवर मोफत तपासणी, उपचार व आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. तसेच बीपी, ईसीजी, इको, रक्तातील साखर तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात येणार आहेत. या सर्व सुविधा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शिबिराच्या उ‌द्घाटन प्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्ष, सीईओ, पोलीस अधीक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन उमेश गाळवणकर यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!