

साळगाव–मुळदेत महायुतीचा प्रचार वेगात; मिलिंद नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यकर्त्यांची भक्कम फौज, ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा – मिलिंद नाईक

कुडाळ : प्रतिनिधी
पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातील साळगाव पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेना–महायुतीचे उमेदवार मिलिंद नाईक यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, संपूर्ण मतदारसंघात त्यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. मतदारसंघातील साळगाव व मुळदे गावात आज त्यांनी प्रचारफेरी काढून ग्रामस्थ व मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत संवाद साधला. या प्रचारफेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिंदे शिवसेनेसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फौज मिलिंद नाईक यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. सकाळी साळगाव तर सायंकाळी मुळदे गावात प्रचारफेरी काढण्यात आली. मुळदे येथील माजी सरपंच गुरूनाथ चव्हाण, गुरूनाथ (पेंटर) चव्हाण, गणपत चव्हाण, तुषार चव्हाण, सागर वारंग, शिवराज वारंग यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रचारफेरीदरम्यान बोलताना मिलिंद नाईक म्हणाले की, शिंदे शिवसेनेतर्फे महायुतीच्या माध्यमातून साळगाव पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, गेले आठवडाभर प्रचारादरम्यान जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद व कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. आज साळगाव व मुळदे येथे काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत ५० ते ६० कार्यकर्ते सहभागी झाले होते. तुळसुली गावातही प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र व राज्यात महायुतीचेच सरकार असून, या निवडणुकीतही येथील जनता निश्चितच महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि साळगाव पंचायत समिती मतदारसंघात आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास मिलिंद नाईक यांनी व्यक्त केला.









