ठळक घडामोडी

माघी एकादशीनिमित्त केळूस ते पंढरपूर भव्य पायीवारीचे आयोजन!

१५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजता केळूसहून पायीवारीचा शुभारंभ

११ दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूरला पोहोचणार पायीवारी

कुडाळ : प्रतिनिधी
     माघी एकादशीचे औचित्य साधून गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तमंडळींच्या सहभागाने प.पू. सदगुरू श्री नामदेव महाराज समाधी मंदिर, केळूस येथून पंढरपूरकडे भव्य पायीवारीचे आयोजन करण्यात आले आहे. प.पू. सदगुरू नामदेव महाराज भक्तमंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने पायीवारी भक्तिभावात काढली जाणार आहे. गुरुवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता केळूस येथील प.पू. सदगुरू श्री नामदेव महाराज समाधी मंदिरातून पायीवारीचा शुभारंभ होणार आहे. ही पायीवारी म्हापण मार्गे माऊली मंदिर पाट, श्री रामेश्वर मंदिर, हुमरमळा, माड्याचीवाडी मार्गे प.पू. सदगुरू श्री राऊळ महाराज समाधी मंदिर, पिंगुळी येथे दुपारी 1 वाजेपर्यंत पोहोचणार असून, तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारनंतर ही वारी पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
    यानंतर पायीवारी प.पू. सदगुरू श्री काका खानोलकर महाराज समाधी मंदिर साळगाव, प.पू. सदगुरू श्री अवधूतानंद महाराज समाधी मंदि माडखोल, प.पू. सदगुरू श्री साटम महाराज समाधी मंदिर दाणोली, प.पू. सदगुरू श्री मुळे महाराज समाधी मंदिर गारगोटी, प.पू. सदगुरू श्री बाळूमामा महाराज समाधी मंदिर आदमापूर, श्री दत्त संस्थान नरसोबाची वाडी, प.पू. सदगुरू श्री तात्यासाहेब माऊली महाराज शिरोळ या महत्त्वाच्या स्थळांना भेट देत मिरज, सांगोला मार्गे तब्बल 11 दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या पायीवारीच्या पहिल्या दिवशी केळूस ते पिंगुळी या मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भाविकांनी, वारकरी बांधवांनी व भक्तांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन प.पू. सदगुरू नामदेव महाराज भक्तमंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!