ठळक घडामोडी

‘हॅप्पी न्यू इयर’ शुभेच्छांच्या नावाखाली फेक एपीके फाईल्सपासून नागरिकांनी सावध रहावे!

कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे आवाहन

व्हॉट्सॲप-टेलिग्रामवरील फेक फाईल्स धोकादायक; पोलिस प्रशासन सतर्क

कुडाळ : प्रतिनिधी
    नववर्षाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲप व टेलिग्रामद्वारे “Happy New Year” अशा शुभेच्छांच्या नावाखाली APK फाईल असलेले संदेश मोबाईल धारकांनी डाऊनलोड करू नये. ते सायबर फसवणूक करण्याचे प्रकार असू शकतात. त्यामुळे अशा संशयास्पद संदेशांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले आहे.
      सध्या व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर “हॅप्पी न्यू इयर” अशा स्वरूपाचा संदेश पाठवून, त्यासोबत एपीके फाईल पाठवली जात आहे. ही फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड किंवा इन्स्टॉल केल्यास मोबाईल हॅक होण्याची, ओटीपी व बँकिंगसंबंधित गोपनीय माहिती चोरीस जाण्याची तसेच आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले की, नागरिकांनी अशा फेक संदेशांपासून सावध रहावे. ओळख नसलेली कोणतीही एपीके (APK) फाईल डाउनलोड करू नये. तसेच संशयास्पद लिंक किंवा एपीके फाईल पुढे फॉरवर्ड करू नये. कोणतीही फाईल डाउनलोड करण्यापूर्वी तिचा स्रोत आणि विश्वासार्हता तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
अशा प्रकारची फाईल चुकून इन्स्टॉल झाली असल्यास किवा सायबर फसवणूक झाली असल्यास तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

error: Content is protected !!