कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांची व्यक्त केली खंत : साळगावमध्ये विज्ञान प्रदर्शन

कुडाळ : प्रतिनिधी
ज्ञानापासून प्रज्ञेकडे नेणारा मार्ग विज्ञानातूनच जातो. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान अत्यावश्यक आहे. यापूर्वी शासनाकडून विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी निधी दिला जात होता. मात्र गेल्यावर्षीचा निधी अद्याप मिळाला नाही. त्यामुळे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी कुडाळ तालुक्यातील एकही शाळा पुढे आली नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी व्यक्त केली. कोणतीच माध्यमिक शाळा तयार नसताना साळगाव मधील प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयाने प्रदर्शन आयोजित करण्यासाठी पुढाकार दर्शवल्यामुळे यावर्षीचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तरी घेता आल्याचे त्यांनी सांगितले. साळगाव येथील प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ आज झाला. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री. वालावलकर बोलत होते.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून कुडाळ तालुकास्तरिय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाला शुक्रवारी साळगाव येथील प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात सुरुवात झाली. या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन कुडाळचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करून झाले. जिल्हा परिषद शाळा साळगाव नं.१ च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर शारबिद्रे, कुडाळ तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अजित परब, परीक्षक संदीप गुरव, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष शशांक आटक, विस्तार अधिकारी स्वप्नाली वारंग आणि रश्मी ठाकुर-देसाई, परीक्षक उदय गोसावी, कृषी विद्यालय ओरोस प्रसाद ओगले, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्रज्ञा सावंत, निवृत्त मुख्याध्यापक विवेकानंद बालम, साळगाव शाळा नंबर. १ चे मुख्याध्यापक श्री. मसके आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
STEM संकल्पनेवर आधारित प्रदर्शन
STEM या संकल्पनेवर आधारित असलेल्या या प्रदर्शनात –
• प्राथमिक विभाग : ४९ विद्यार्थी, ३ शिक्षक, ३ दिव्यांग विद्यार्थी, ४ शिक्षकेतर कर्मचारी
• माध्यमिक विभाग : २२ विद्यार्थी, २ शिक्षक, ४ दिव्यांग विद्यार्थी, २ शिक्षकेतर कर्मचारी असे मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
समृद्ध विज्ञान परंपरेला चालना
श्री. वालावलकर म्हणाले, विज्ञान प्रदर्शन हा अनेक वर्षांपासून सुरू असलेला ज्ञानयज्ञ आहे. यामुळे विद्यार्थ्यांची विज्ञानदृष्टी विकसित होते. देशाची उभारणी ही विज्ञानावर आधारित विचारसरणीमुळेच शक्य आहे. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रतिकृती राज्यस्तरावर निश्चितच चमकतील.
इतर मान्यवरांचे विचार
• संदीप गुरव म्हणाले की ग्रामीण मुलांमध्ये नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास असतो, त्यामुळे ते जिल्हा–राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करतात.
• शशांक आटक यांनी सांगितले की गेल्या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनाचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत असून, विज्ञान प्रदर्शनासाठी नियमित निधी मिळाला पाहिजे.
उद्घाटनानंतर प्रतिकृतींची पाहणी
उद्घाटन सोहळ्यानंतर गट विकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते भित्तीपत्रिकेचे तसेच विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध वैज्ञानिक मॉडेल्सची मान्यवरांनी पाहणी केली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व दिव्यांग विद्यार्थ्यांनीही आकर्षक प्रतिकृती सादर केल्या.या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ सोमवारी, १५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.









