ठळक घडामोडी

पी.एम.श्री. जि.प. प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी परिसर भारावला

कुडाळ : प्रतिनिधी
     पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुडाळ कुंभारवाडा येथे सोमवारी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत देशभक्तीमय, आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास शाळेचे आजी–माजी विद्यार्थी, पालकवर्ग, ग्रामस्थ तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    झेंडावंदन, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापकांनी दिलेल्या शुभेच्छा व मार्गदर्शनामुळे उपस्थित सर्वजण अंतर्मुख झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले सुरेल समूहगीत व त्यांना लाभलेली मनमोहक संगीत साथ उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली. शाळेच्या ढोलपथकाच्या दणदणीत तालावर झालेले शिस्तबद्ध संचलन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. देशभक्तीपर नृत्य, एरोबिक्स, मानवी मनोरे, डंबेल्स, घुंगुरकाठी, रिंग कवायत तसेच कराटे प्रात्यक्षिके यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रभावी देशभक्तीपर भाषणे व स्वरचित कविता प्रेरणादायी ठरल्या. कु. मैत्रेय गंगावणे याने सादर केलेले स्केटिंग प्रात्यक्षिक व राष्ट्रीय ध्वजाला दिलेली सलामी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. गुणवंत व कलाप्रेमी विद्यार्थ्यांचा कोपरा तसेच विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. श्रीम. जाधव, श्रीम. कडुलकर व श्री. राऊत या पालकांनी आपली मनोगते व्यक्त करत शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.या कार्यक्रमाला नगरसेवक श्री. उदय मांजरेकर व श्री. गणेश भोगटे, श्री. अनंत कुडाळकर (पोलीस पाटील), श्रीम. श्रद्धा देसाई (शा.व्य. स. अध्यक्ष), श्रीम. स्वप्नाली सावंत (मुख्याध्यापक) तसेच सर्व समिती अध्यक्ष व सदस्य, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षकवृंद श्रीम. सायली कदम, श्रीम. चैत्राली पाटील, श्रीम. ऋतुजा गावडे, श्रीम. स्वराली लाड, श्रीम. वंदना परब, श्री. गुरुनाथ सावंत, श्रीम. गौरी गोसावी, श्रीम. दिपाली मोहिते, श्रीम. अरुणा गोठोस्कर आदी उपस्थित होते.
     दुपारच्या सत्रात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले. महिलांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण उखाण्यांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व महिलांमध्ये आनंद व आपुलकीची भावना दृढ झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. गुरुनाथ सावंत व श्रीम. ऋतुजा गावडे यांनी केले, तर आभार श्रीम. स्वराली लाड यांनी मानले. अशा विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व शारीरिक उपक्रमांनी नटलेला हा प्रजासत्ताक दिन शाळेच्या सर्वांगीण विकासाचा गौरव करणारा ठरला व उपस्थितांच्या मनात अविस्मरणीय आठवणी निर्माण करून गेला.

error: Content is protected !!