ठळक घडामोडी

एलईडी मासेमारीचा ‘भस्मासुर’ थोपवा – हरी खोबरेकर!

एलईडी मासेमारीविरोधात १० एप्रिलला मालवणात भव्य मोर्चा

पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय; ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

मालवण : प्रतिनिधी
     गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या विनाशकारी एलईडी लाईट फिशिंगमुळे पारंपरिक आणि छोटा मच्छीमार उद्ध्वस्त होत आहे. या ‘भस्मासुरा’ला आवर घालण्यात मत्स्य विभाग अपयशी ठरत असून, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त लाभलेल्या नौकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या १० एप्रिल रोजी माजी आमदार वैभव नाईक आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य विभाग कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      मालवण ठाकरे शिवसेना शाखा कार्यालयात आज सोमवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, अनिता गिरकर, तालुका संघटक दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी मेतर, उमेश मांजरेकर, हेमंत मोंडकर, मनोज मोंडकर आदी उपस्थित होते.
     श्री. खोबरेकर म्हणाले की, “आज सिंधुदुर्गचे सुपुत्र नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री असतानाही छोट्या मच्छीमारांवर अन्याय होत आहे. एलईडी मासेमारीचे मुख्य केंद्र देवगडमध्ये असूनही तिथल्या बोटींना राजाश्रय दिला जात आहे. एखादी दुसरी नौका पकडून मत्स्य विभाग केवळ वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमार आज कर्जबाजारी झाला असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.” समुद्रातील मासळी ओरबडणाऱ्या बेकायदेशीर एलईडी नौकांना चाप लावणे. वाढलेल्या डिझेलच्या किमतींमुळे मच्छीमारांचा व्यवसाय तोट्यात जात असून, त्याबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी. हा भव्य मोर्चा भरड नाका ते बंदर जेटी, त्यानंतर फोवकांडा पिंपळ मार्गे धुरीवाडा येथील मत्स्य विभाग कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनात सर्व नौका मालक, खलाशी, मासळी विक्रेते, श्रमिक आणि श्रमजीवी मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. समुद्र हा आपल्या हक्काचा आहे, तो कुणाच्या बापाचा नाही. मूठभर धनदांडग्यांसाठी पारंपरिक मच्छीमारांचा बळी दिला जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. आपली ताकद दाखवण्यासाठी सर्व मच्छीमारांनी १० तारखेला रस्त्यावर उतरावे. असे आवाहन श्री. खोबरेकर यांनी यावेळी केले आहे.

error: Content is protected !!