ठळक घडामोडी

अणावला समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद

ग्रा.पं. लवकरच शारीरिक – मानसिक आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र शिबिरे घेणार – सरपंच लिलाधर अणावकर

कुडाळ : प्रतिनिधी
    माणसाचे आरोग्य हे शारीरिक व मानसिक अशा दोन प्रकारचे असते. अणाव ग्रामपंचायतीच्या वतीने आतापर्यंत शारीरिक आजारांच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. भविष्यात शारीरिक आजारांसोबतच मानसिक आजारांची तपासणी व उपचार यासाठी स्वतंत्र आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे, असे प्रतिपादन अणाव सरपंच लिलाधर अणावकर यांनी केले.
अणाव ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मानव साधन नर्सिंग स्कूलमधील प्रशिक्षणार्थी नर्सिंग विद्यार्थ्यांसह अणाव गावातील ग्रामस्थांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक व पणदूर हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आर. एम. नरे व अणाव ग्रामपंचायतीचे सरपंच लिलाधर अणावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपसरपंच आदिती अणावकर, ग्रामपंचायत सदस्य रावजी जिकमडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप नारकर, ग्रामस्थ सुरेश पवार, कसाल आरोग्य केंद्राच्या डॉ. अश्विनी महेंद्रकर, आरोग्य उपकेंद्र अणावचे समुदाय आरोग्य अधिकारी विद्याधर तांबे, आरोग्य सेवक सतीश गोठणकर, आरोग्य सेविका सौ. धुरी, आशा सेविका सायली पाटकर व सेजल बागवे, अणाव ग्रामपंचायत तसेच रामेश्वर क्रीडामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, मूत्रपिंड तपासणी, थायरॉईड, कॅल्शियम तपासणी तसेच ई.सी.जी. अशा विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. या आरोग्य शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घेतला असून, ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!