ठळक घडामोडी

कलाविषयक उपक्रमांत पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!

कुडाळ : प्रतिनिधी
    पाट हायस्कूलमध्ये एकनाथ ठाकूर कला अकादमीच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध कलाविषयक उपक्रमांतील यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शुभेच्छा कार्ड निर्मिती, वारली पेंटिंग आणि आकाशकंदील तयार करणे अशा उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
    दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीमधील सुमारे ३७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देत, उत्सवांचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वारली चित्रकलेतून पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारसा जपला गेला, तर शुभेच्छा कार्ड व आकाशकंदील निर्मितीतून सर्जनशीलतेला वाव देण्यात आला. या उपक्रमांतून तयार झालेल्या विविध कलात्मक वस्तूंचा वापर शाळेच्या सजावटीसाठीही करण्यात आला.
शुभेच्छा कार्ड निर्मिती स्पर्धेत ऋता मार्गी हिने प्रथम, कामिनी कुंभार हिने द्वितीय, उत्कर्षा केरकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ वैष्णवी चव्हाण, हर्षिता ताम्हाणेकर व ध्रुव भगत यांना गौरविण्यात आले. वारली पेंटिंग स्पर्धेत योगिनी खोर्जुवेकर प्रथम, खुशी कोचरेकर द्वितीय, पूर्वा मुननकर तृतीय ठरल्या. उत्तेजनार्थ धनीशा परब, अंतरा दुतोंडकर व दूर्वा म्हैसकर यांना पारितोषिके देण्यात आली. आकाशकंदील निर्मिती स्पर्धेत मयुरी धुरी हिने प्रथम, नाविण्या निवतकर हिने द्वितीय, तर विजय घारे याने तृतीय क्रमांक मिळविला. सम्राट तुळशीदास कुडतरकर (कोचरे) यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांना रंगसाहित्य देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
या गौरव कार्यक्रमाला संस्था कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी विजय मेस्त्री, कला शिक्षक संदीप साळसकर, दिपिका सामंत, दत्तात्रय कुबल, तनुजा कुमठेकर तसेच अन्य शिक्षक उपस्थित होते. संस्था व विद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.
आजच्या मोबाईल युगात विद्यार्थ्यांच्या हातांना व विचारांना सर्जनशील वळण मिळावे, या उद्देशाने असे कलाविषयक उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांमधून व्यक्त करण्यात आले. एकनाथ ठाकूर कला अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्यामुळे विविध कलाक्षेत्रात या विद्यार्थ्यांची चमक दिसून येत आहे.

error: Content is protected !!