
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहीती
१२ मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळण्यासाठी गुरूवार दि.१२ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व बागायतदारांनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वपक्षीय मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे, अशी माहीती सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
श्री.सामंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्याच्या अर्थसंकल्पात तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना दिलासा देणारी आर्थीक नुकसान भरपाईची भरघोस तरतूद राज्य सरकारने केली नाहीच,याचा स्पष्ट अर्थ तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना आर्थिक खाईत लोटण्याचाच निंदाजनक प्रकार राज्य सरकारचा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तळकोकणातील आंबा काजू बागायतदार पूर्णपणे कोलमडून गेला आहे. कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना मशागत, औषध फवारणी, मजूरी अशा अनेक मशागतीच्या कामासाठी एक हेक्टरसाठी सुमारे चार ते पाच लाख रुपये खर्च येतो आणि शेवटी जीवापाड मेहनतीच्या जोरावर पिक हातात यायच्या मोसमात हवामानाच्या बदलत्या अस्मानी संकटामुळे कोंकणातील बागायतदार शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागतो, आणि कर्जबाजारी होतो आहे, यावर्षी ९५ टक्के बागांच्या पिकांचे नुकसान झाले असून,अशा बाधीत सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई फक्त जाहीर न करता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मागणी केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवार दि. १२ मार्च रोजी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी १२ मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.








